कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार असून, वारकऱ्यांना पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. एकादशीसाठी एसटी महामंडळाकडून श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी ८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रे निमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली
यंदाच्या आषाढी एकादशीच्या पायी वारीसाठी २१ जूनला आळंदीतून पंढरीकडे माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये जि. सातारा अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी असणार आहे. तर, दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकऱ्यांना वाहन पास दिले जाणार आहे.