अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील, अशा शब्दांत जितेंद्र आव्हांडांच्या पत्नी ऋता आव्हाडांनी पहिली प्रतिक्रिया दिली. याबाबत त्यांनी तीन ट्वीट केले आहेत.
ऋता यांनी म्हटलं की, रिदा रशिद या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती स्पॉनटेनियस रिअॅक्शन होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशिद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी हे गुन्हे रिदाविरोधात दाखल आहेत, असंही ऋता यांनी सांगितलं.
रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच रिदा रशीद त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांना पकडून बाजूला लोटलं होतं.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे कि, माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी ३५४ कलम लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी म्हटले होते. आज माझी मुलीला देखील लोक विचारतील कि, तुझ्या वडिलांनी विनयभंग केला का?
जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाडने देखील एका वृत्तसंस्थेशी बोलताना भावनिक भाष्य केलं आहे. ‘आम्ही खुप डिस्टर्ब झालो आहोत. वडिलांवर झालेल्या आरोपामुळ संपूर्ण कुटूंब तणावत आहे. मानसिक त्रास झाला आहे. महिलांसाठीच्या कायद्याचा गैरवापर करु नका’ अशी विनंती नताशाने केली आहे. तत्पूर्वी, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली.