मागील अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवाच्या गतीने सुरु आहे. काम सुरु होऊन ठेकेदार अर्धवट कामे सोडून जातात, तर काही वेळा तर एवढ्या धीम्या गतीने काम सुरु असते कि अजून किती वर्ष हे काम पूर्णत्वास जायला लागणार याबद्दल प्रश्नच पडतो.
काम वेळेमध्ये पूर्ण न झाल्याने अनेक अपघात घडतात. आणि मुख्य वाह्तुकीचेच रस्ते कामामुळे बंद करण्यात येत असल्याने व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
माजी सभापती शौकत मुकादम यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांना सर्व परिस्थिती कथन करून महामार्गाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी आग्रही विनंती केली आहे. २२ जुलै रोजी कोकणात महापूर आला. कोकणावर फार मोठे नैसर्गिक संकट उद्भवले. कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत महिन्या भरात ठेकेदार कंपन्या बदलत आहेत. एखाद्या कंपनीने काम सुरू केले की ते अर्धवट ठेवून जात आहेत. त्यावेळी महामार्गाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे, काही ठिकाणी केलेले खोदकाम तर काही ठिकाणी टाकलेले भराव यामुळे पुराचे पाणी सर्वत्र पसरले गेले. त्यामुळे बर्याच लोकांचे बऱ्याच प्रकारे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शौकत मुकादम यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ना. गडकरी यांना म्हटले आहे कि, आपण केंद्रातील कर्तबगार मंत्री आहात व विशेष म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र हे तुमचे आमचे असे एक घर आहे. आणि घरातील माणसे संकटात असतील तर, कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हाला या महामार्गाच्या संकटातून बाहेर काढावे, अशी आपणास विनंती आहे.