खेड तालुक्यातील दिवा बेट परिसरातील कोतवलीत मंगळवारी हजार किलो, तर आयनीमध्ये तब्बल १७०० किलो मासे मच्छीमारांना मिळाले. २५ वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात मासे खाडीपट्ट्यातील मच्छीमार आनंदात आहेत. करंबवणे खाडीत लोटेतील प्रदूषित पाणी ज्या ठिकाणी सोडले जाते त्या ठिकाणी बंपर मासळी मिळाली. खाडीत दिवा बेट परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. मात्र, याच ठिकाणी लोटे सीईटीपीतून रासायनिक सांडपाणी आणून सोडले जाते. याच ठिकाणी तेथे गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृतपणे पंधरा ते वीस सक्शन पंप वाळू उत्खनन करीत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हे पंप बंद करण्यात आले आहेत. याच दिवा बेट परिसरात सध्या स्थानिक मच्छीमार पारंपरिक जाळे लावून मासळी पकडत आहेत.
होड्या भरून मासळी आणली जात आहे. यामध्ये मांगण, बांण शिंगटी, अणू, मुशी, खरबा आदी मासळीसह काही थोडी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोटेतील सीईटीपीमध्ये फार मोठे बदल झाले. प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबरोबराच प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना केली गेली. या खाडीत १९९७ मध्ये झालेल्या लोटेतील रासायनिक प्रदूषणानंतर या खाडीची वाताहात झाली. प्रदूक्षणाविरोधात दाभोळखाडी संघर्ष समितीच्या माध्यमातून असंख्य आंदोलने करण्यात ‘आली. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम हळूहळू खाडीवर होऊ लागला. आता त्याच्या जोडीलाच खाडीत वाळू उपसा करणारे सक्शन पंप बंद करण्यात आले आहेत.
आवक वाढल्याने भाव घसरले – खाडीत दोन-तीन किलोचे मासे मिळत आहेत. माशांचे प्रमाण अधिक असल्याने घाऊक बाजारात विक्री केली जात आहे. यामध्ये तीनशे रुपये किलोचे मासे ७० रुपये किलोनेही देण्याची वेळ आली आहे. सद्यःस्थितीत दिवा बेट परिसर, आयनी, कोतवली, आदी भागांत लावल्या जाणाऱ्या मासेमारी वाणामध्ये ही मासळी सापडत आहे.