रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे जाणाऱ्या फाट्यासमोर भरधाव बुलेट दुचाकीची समोरुन येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकीला धडक बसून अपघात झाला. हा अपघात बुधवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वा. सुमारास झाला. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बुलेट चालक राजेश दिनकर किर (४१, रा. रनपार, रत्नागिरी) बुलेटवरुन सोबत मिलिंद कृष्णा महाडिक (४७, रा. फणसोप, रत्नागिरी) यांना घेउन रत्नागिरी ते पावस असा जात होता. त्याच सुमारास मानसी राजेंद्र पवार ही तरुणी अॅक्टिव्हा दुचाकीवर पाठीमागे तिची बहिण ऋद्राक्षा राजेंद्र पवार (१७, दोन्ही रा. भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) हिला घेउन कॉलेजला जात होती. या दोन्ही दुचाकी भाट्ये गावाकडे जाणाऱ्या फाट्यासमोर आल्या असता बुलेट चालक राजेश किरचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याने समोरुन येणाऱ्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे बुलेट चालक राजेश किर रस्त्यावर फेकला जाऊन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावर रक्ताच्या सड्यातच तो कोसळला होता. अपघातांची माहिती मिळातच शहर पोलिस कर्मचारी आणि माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भाटकर आणि स्थानिक नागरिकांनी चारही जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. अपघातातील इतर ३ जखमींची प्रकृती स्थिर असून बुलेट चालक राजेश किर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.