विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री ९ वाजता राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. अपेक्षेप्रमाणे अर्थखात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे कायम असून दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृह निर्माण ही दोन महत्वाची खाती सोपविण्यात आली आहेत. कोकणचा विचार करता रत्नागिरीच्या उदय सामंत यांच्याकडे पुन्हा एकदा उद्योग खाते सोपविण्यात आले आहे. तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे गृहराज्यमंत्री पदासह महसूल, ग्रामविकासं आणि पंचायतराज, अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण, तसेच अन्न आणि औषध प्रशासन अशा एकूण ५ महत्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. नितेश राणेंना मत्सव्यवसाय सिंधुदुर्गच्या नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास हे महत्वाचे खाते सोपविण्यात आले आहे. रायगडच्या आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते सोपविण्यात आले असून तर महाडच्या भरतशेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि जमीन सुधारणा हे खाते सोपविण्यात आले आहे.
अन्य महत्वाचे मंत्री – भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना पर्यावरण तर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा उच्च आणि तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे. तर दादा भुसे हे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील.
सोमवारी कार्यभार स्विकारणार – शनिवारी हिवाळी अधिवेशनचे सूप वाजताच खातेवाटप जाहीर झाले असून सोमवारी सर्व मंत्री मुंबईतील मंत्रालयात कार्यभार स्वीकारतील. आता पालकमंत्रीपदासाठी इच्छुक मंत्र्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.