शहरातील मार्कंडी येथील प्रभात रोडलगत असलेल्या बांधकामावर येथील नगर परिषदेने गुरुवारी जेसीबीच्या साह्याने धडक कारवाई केली. शहरविकास आराखड्यातील रस्त्यांमध्ये लोखंडी गेट उभारून मार्ग बंद करण्यात आला होता; मात्र नगरपरिषदेने नोटीस बजावूनही बांधकाम न हटवल्याने अखेर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई केली. नगरपालिकेच्या २०१८ मध्ये अंतिम मंजूर झालेल्या शहरविकास आराखड्यात चार मीटर रुंदीचा रस्ता प्रभात रोडपासून नारायण तलावाकडे जाण्यासाठी नियोजित करण्यात आला. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरपंचायत आता या रस्त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार या ठिकाणी रस्ता तयार करण्याच्यादृष्टीने नगरपालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या आधी या रस्त्यात असलेले अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
या रस्त्याच्या मार्गातच एकाने लोखंडी गेट तसेच तारेचे कुंपण घातले होते. त्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. या विषयी पालिकेकडून संबंधितांना पत्र देऊन बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाकडून प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी नगररचना विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत पालिकेने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या सार्वजनिक रस्त्यावरच जे अतिक्रमण केले आहे ते त्वरित सात दिवसांत काढून टाकावे; अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही, असे समजून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला होता, तरीही हे बांधकाम न हटवल्याने अखेर कारवाई करण्यात आली.
कारवाई सुरूच राहणार – चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामावर येथून पुढे अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियम व अटींचे पालन करूनच बांधकाम करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.