बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध धर्मीयांवर होणाऱ्या अमानुष, क्रूर हल्ल्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने आज मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला भेट देऊन आमदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी पाठिंबा दर्शवला. ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची दयनीय स्थिती केली आहे तशीच कारवाई बांगलादेशावर व्हायला हवी, असा इशारा महाराष्ट्रातून देत असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले तसेच असे कोणतेही प्रसंग घडल्यास शिवसेना, सर्व आमदार विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोबत आहेत, असा विश्वास व्यक्त केला. जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सकाळी १० वाजल्यापासून मूक धरणे आंदोलन सुरू झाले. सर्व नजरा बांगलादेशातील हिंदूंकडे, हिंदूंच्या रक्षणासाठी मैदानात, आमचा पाठिंबा बांगलादेशी हिंदूंना अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी प्रदर्शित केले होते.
कुमार जोगळेकर, विवेक वैद्य, डॉ. सप्रे, अॅड. रूची महाजनी आदी उपस्थित होते. फलकावर स्वाक्षरीमोहीम राबवण्यात आली. आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देण्यात आले. आमदार उदय सामंत म्हणाले, इस्कॉन मंदिरावर हल्ला, अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार या घटना निषेध म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे धरणे आंदोलन होत आहे. आजचे आंदोलन झाले म्हणजे जबाबदारी संपली नाही तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे.
कर्नाटक सरकारचा निषेध – कर्नाटक सरकारने वीर सावरकरांचा अपमान केला आहे, हा प्रकार निंदनीय आहे. बेळगावबाबत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेईल. अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर वीर सावरकर रत्नागिरीमध्ये १३ वर्षे वास्तव्याला होते. त्यामुळे मला सावरकरांबद्दल नितांत आदर आहे; परंतु कर्नाटक सरकारने त्यांची प्रतिमा काढली याबद्दल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला जाणाऱ्यांना अटकाव केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा निषेध करतो. मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असे आमदार सामंत यांनी सांगितले.