शहरातील खेंड कांगणेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी संरक्षक भिंतीसह दरड कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारास नगर परिषदेने नोटीस बजावली आहे. विश्वासात न घेता परस्पर संरक्षक भिंतीचे काम केले. घाईघाईने व चुकीच्या पद्धतीने झालेल्या या कामाचा फटका बसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे याशिवाय या कामावर देखरेख करणाऱ्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट कन्स्लटन्सी’ लादेखील जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पाच कुटुंबांसह एका बहुमजली इमारतीतील रहिवाशांनाही स्थलांतरित करावे लागले आहे. गेले काही दिवस येथे सुरू असलेल्या पावसात शहरातील खेंड कांगणेवाडी येथे शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंतींसह दरड कोसळली. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सुमारे २५ लाखांचे हे एकत्रित काम असून, दीड वर्षापूर्वी या कामाचे आदेश देण्यात आले होते. त्यातील १४ मीटरची संरक्षक भिंत आधी उभारण्यात आली होती तर उर्वरित भिंतीचे काम दोन महिन्यांपूर्वी पोटठेकेदाराच्या माध्यमातून घाईघाईने केले गेले. याबाबत नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी माहिती देताना सांगितले की, ठेकेदार संजीव साळवी यांना दीड वर्षापूर्वी या कामाचे लेआऊट दिले होते. कोल्हापूर येथील देशपांडे यांच्या प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट कन्स्लटन्सीमार्फत या कामाची देखरेख केली जात होती; मात्र काही कारणास्तव हे काम अर्ध्यावरच थांबले होते. त्याप्रमाणे झालेल्या कामाचे बिलही अदा केले आहे; परंतु उर्वरित काम सुरू करताना ठेकेदाराने नगर परिषदेला विश्वासात घेतले नाही. परस्पर चुकीच्या पद्धतीने व घाईघाईत केलेल्या कामाचा फटका बसला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर दोन दिवसात कारवाई केली जाणार आहे तसेच संबंधित प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट कन्स्लटन्सीला देखील बोलावून घेण्यात आले आहे.
जाळीद्वारे चिखल रोखण्याचा प्रयत्न – या घटनेमुळे खेंड कांगणेवाडी येथील जाधव, राणिम आणि शिंदे या कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्यात आले तसेच दरडीच्या पायथ्याशी असलेल्या यतीन कानडे, प्रभुलकर व शुभम अपार्टमेंटमधील रहिवाशांना देखील धोका निर्माण झाल्याने त्यांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. सद्यःस्थितीत या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून दरडीच्या ठिकाणी प्लास्टिक कापड टाकून पावसाच्या पाण्याचा निचरा केला आहे तसेच दरडीच्या खालील बाजूने लोखंडी जाळी टाकून वाहून येणारा चिखल रोखण्याचा प्रयत्न केला आहे.