संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीपट्ट्यात मंगळवारी (ता.८) दोन ते तीन वाळू व्यावसायिकांनी मध्यरात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीने ड्रेझरच्या साहाय्याने जवळपास तीनशे ब्रास वाळू उपसा केला. रातोरात ही वाळू डंपरच्या माध्यमातून जागेवरून हलवली जात होती; मात्र संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी वाळू भरलेले चार डंपर करजुवे येथे पकडले. वाळूचोरी रोखण्यात संगमेश्वर तालुक्याचा महसूल विभाग पूर्णतः अपयशी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आता करजुवे तलाठी, मंडल अधिकारी आणि संगमेश्वर तहसीलदार यांच्यावर महसूल मंत्री कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. करजुवे येथून चोरट्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची कुणकूण संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांना माहिती मिळताच त्यांनी मध्यरात्री थेट करजुवे गाठले. छुप्या पद्धतीने आणि ड्रेझरचा वापर करून संगमेश्वर तालुक्याच्या करजुवे खाडीत बेसुमार वाळू उपसा सुरू होता; मात्र प्रत्यक्षात पोलिसांना करजुवे येथे ओली वाळू भरलेले चार डंपर आढळले.
गेले आठवडाभर वाळू माफिया करजुवे खाडी भागात छुप्या पद्धतीने मध्यरात्री ड्रेझरच्या साहाय्याने वाळू काढत असल्याची चर्चा सुरू होती. वाळू चोरी करणारे खाडीतून पसार झाले; मात्र जागेवर ओली वाळू भरलेल्या स्थितीत आढळलेल्या डंपरवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये राजेश रवींद्र चव्हाण (रा. डेरवण, चव्हाणवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), विक्रम विलास महाडिक (मुरादपूर, शंकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), शुभम अजित चव्हाण (रा. कळंबुशी, अलेटीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), यांचा समावेश आहे. (डंपर क्र. एमएच ०९, टीसी ०१५८ वरील चालक नाव, गाव माहिती नाही.) डंपर आणि वाळूसह साठ लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरटे व्यवसाय तात्पुरते बंद – ज्या भागात वाळूची चोरी होताना आढळेल तेथील तहसीलदारांना निलंबित केले जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री विधानसभेत करतात. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडी भागात गतमहिन्यात पाच ते सहा वाळूमाफियांकडून बेसुमार वाळू उपसा केला जात होता; मात्र थेट तहसीलदारांवरच कारवाईची घोषणा होताच हे चोरटे व्यवसाय तात्पुरते बंद करतात. महसूलचे अधिकारी स्वतःवर कारवाईची वेळ येताच वाळू चोरीचे प्रकार एका दिवसात बंद करू शकतात, हेच यातून सिद्ध झाले.