देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि ‘भारत कुमार’ या टोपणनावासाठी ओळखले जाणारे जेष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. मनोज कुमार यांच्या निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखलं जातं. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केलं त्यांना भारत कुमार असंही म्हटलं जाई ते याच कारणामुळे. त्यांच्या चित्रपटांमधली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती या गाण्याशिवाय तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेही होत नाहीत.
चित्रपटसृष्टी हळहळली – गेल्या अनेक वर्षांपासून मनोज कुमार यांनी चित्रपटांमधून काम करणं सोडलं होतं. मात्र त्यांनी अभिनय केलेले चित्रपट लोकांच्या स्मरणात आजही आहेत. ‘सहारा’, ‘हनीमून’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरी आवाज सुनो’, ‘नसीब’, ‘नीलकमल’, ‘पत्थर के सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मनोज कुमार यांना नॅशनल अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टी हळहळली आहे.
भारत कुमार – मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने ओळखलं जायचं. त्यांचे अनेक चित्रपट हे देशभक्तीचं महत्त्व सांगणारे होते. त्यामुळे त्यांना लोक भारत कुमार म्हणू लागले होते. हे नाव त्यांनाही खूप आवडलं होतं आणि त्यांनी ते आयुष्यभर मिरवलं. रोटी, कपडा और मकान या चित्रपटातील त्यांची भूमिकाही गाजली. तसंच त्यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. क्रांती या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासह काम केलं. या चित्रपटात हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, परवीन बाबी, सारिका, प्रेम चोपडा अशी तगडी स्टारकास्ट होती. हा चित्रपटही त्यातल्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केलं होतं. तर त्यात मुख्य भूमिकाही साकारली होती.
चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द – मनोज कुमार यांनी फॅशन या चित्रपटातून १९५७ मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिथपासून पुढची ३८ वर्षे म्हणजे जवळपास चार दशकं ते काम करत होते. १९९५ मध्ये आलेला मैदान ए जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमधून काम केलं नाही. शोर, क्रांती, क्लर्क, रोटी कपडा और मकान, जय हिंद, उपकार या चित्रपटांमध्ये त्यांनी दिग्दर्शकाची आणि संकलकाची भूमिकाही पार पडली. शोर या सिनेमातील इक प्यार का नगमा है हे गाणंही आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
सरकारविरूध्द खटला – मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. मनोज हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशाची कहाणीही बरीच रंजक आहे. असं म्हटलं जातं की एकदा ते कामाच्या शोधात एका फिल्म स्टुडिओमध्ये फिरत होते. त्यांनी त्यांना सांगितलं की ते काम शोधत आहेत. त्यांना इथे काम मिळालं पण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणारे दिवे आणि इतर आवश्यक उपकरणे उचलून हलवावी लागली. त्यांनी आपले काम परिश्रमपूर्वक केले आणि नंतर त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागलं.
पंतप्रधानांनी श्रध्दांजली – अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचं वृत्त वेदनादायी आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतले आदर्श होते. त्यांच्या देशभक्तीविषयक चित्रपटांसाठी ते ओळखले गेले. तसंच त्यांच्या मनातही देशाभिमान होता. त्यांच्याकडून आम्हाला कायमच प्रेरणा मिळत राहिल. मनोज कुमार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे सहवेदना. या आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.