रत्नागिरीसह इतर तालुक्यात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱ्या इतर जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने दिवाळीनिमित्त आपल्या गावी जात असतात. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय होवू नये, त्यांचा प्रवास चांगला, सुखकर व्हावा, यासाठी रत्नागिरी एसटी विभागाच्यावतीने १६ ते २६ ऑक्टोबरच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दररोज १५ ते २० असे २०० जादा फेऱ्या सोडणार आहेतः त्याचे नियोजन झाले असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून आणखीन जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कित्येकजण कामानिमित्त, व्यवसाय, शिक्षण, नोकरीनिमित्त कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आले आहेत. मात्र सणासुदीत येथील चाकरमानी आपल्या मूळ गावी हमखास जातोच. दिवाळीच्या पार्श्वभूम और सर्वांनाच आपल्या गावाकडे जाण्याची ओढ असते. त्यासाठी प्रवाशी लालपरीलाच पसंती देतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवू नये, त्यांचा चांगला व आरामदायी प्रवास होण्यासाठी’ रत्नागिरी एसटी विभागाच्या वतीने २०० हून अधिक जादा फेर्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील चाकरमानी, प्रवाशांनी आताच तिकीट आरक्षण करून घ्यावे असेही आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र राज्यातील पूरपरिस्थिती पाहता एसटीची हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांना दिले होते. त्यामुळे हंगामी भाडेवाढ रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी धावणार लालपरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांत दिवाळीसाठी गाड्या धावणार आहेत.