रिफायनरी प्रकल्पाला हळूहळू का होईना पण सकारात्मक वळण लागते आहे त्यामुळे रत्नागिरी मध्ये व्यवसायभिमुख असे उद्योग अजून सुरु व्हावेत आणि त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, कोणीही बेरोजगार राहू नये. अशी आग्रही मागणी भाजपाचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, राजापूरमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प व्हावा, ही भाजपची पूर्वीपासूनच भूमिका आहे. परंतु दुर्दैवाने काही राजकीय लोकप्रतीनिधिनी गेले अनेक वर्ष रत्नागिरीमध्ये औद्योगिक प्रकल्प येऊच नयेत, अशा प्रकारची भूमिका लावून धरल्याने रत्नागिरी जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील युवकांना योग्य संधीना मोठ्या प्रमाणात मुकावे लागले आहे. त्यामुळे लवकरात लवकर रत्नागिरीमध्ये रिफायनरी प्रकल्प मार्गस्थ व्हावा, अशीच मागणी भारतीय जनता पार्टीची आहे, अशी ठाम भूमिका भाजप द. रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मांडली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक प्रकल्प आले पाहिजेत. त्यामुळे रत्नागिरीच्या विकासाला गती प्राप्त होईल. त्याचबरोबर बेरोजगारीचा मार्ग देखील नष्ट होऊन रोजगार मिळाला तर असे विकसनशील प्रकल्प हे वरदानच ठरतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी रिफायनरी प्रकल्प राजापूर येथे प्रस्तावित केला. त्याचप्रमाणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा प्रकल्प मार्गी लागावा, म्हणून विशेष मेहनत घेतली आहे. रत्नागिरीच्या विकासाची गती हा प्रकल्प मार्गस्थ झाल्याने वाढणार आहे. येथील अर्थकारण गतिमान होणार आहे. तसेच रिफायनरी प्रमाणे अन्य विविध प्रकल्प प्रामुख्याने ऑटोमोबाईल प्रकल्प रत्नागिरीमध्ये सुरू व्हावेत, यासाठी भाजपा कायम आग्रही आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाची असल्याचे द.रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.