भा.ज.पा. रत्नागिरी गावागावात वि.वि.का. सेवा संस्थाना संपर्क करून या संदर्भाने जनजागृती करून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठींबा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲड. पटवर्धन म्हणाले आहेत. रत्नागिरी मधील शेतीक्षेत्र धारणेची पद्धती असणारी सहहिस्सेदारी, तुकड्या तुकड्यात विखुरलेले शेती क्षेत्र, सामायिक मालकी तत्त्वावर दप्तरी नोंद असलेल्या जमिनी या सर्वांमुळे वि.वि.का. सेवा संस्थांच्या पोटनियमात शासन निर्णयानुसार १० आर क्षेत्र नावावर धारण असल्याशिवाय, सभासद होता येत नाही ही अट गावातील शेतकऱ्यांवर तसेच वि.वि.का. संस्थेसाठी ही अन्यायकारक ठरत आहे.
रत्नागिरी मधील शेतकऱ्यांकडे १० आर क्षेत्र प्रत्येकाच्या स्वत:च्या नावावर असेलच असे नाही. शेती क्षेत्रातील काही सहहिस्सेदार बाहेरगावी असतात, आणेवारी लागलेली असते, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या वि.वि.का. सेवा संस्थाचा लाभ त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्वांनाच घेता येत नाही आणि विविध कर्ज योजना तसेच अन्य सेवापासून शेतकरी तसेच ग्रामस्थ कायमच वंचित राहिलेले निदर्शनास आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून १० आर क्षेत्र धारणेची अट रद्द व्हावी ही मागणी जोर धरत आहे. मात्र शासन तसेच लोकप्रतिनिधी वि.वि.का. संस्थेचे सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ यांच्या मागणीला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर तसेच वि.वि.का. संस्थावर अन्याय होत आहे. शासनाने १० आर क्षेत्र धारण करण्याची वि.वि.का. संस्थेतील पोटनियमात असलेली अट व त्या संदर्भाने असलेले धोरण ताबडतोब बदलावे व सदस्य होण्यासाठी १० आर क्षेत्र धारण करण्याची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी मा. सहकार मंत्री, मा. सहकार आयुक्त यांना पत्राद्वारे लिहून केली आहे.