सर्वत्र काल झालेल्या श्री गजाननाच्या आगमनाने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी गणपती स्थानापन्न झाल्याने, सणाची लगबग आणि आवडत्या गणेशाच्या स्वागताचा आनंद घराघरात दिसून येत आहे.
ॲड. दीपक पटवर्धन यांनी श्री गणेशाकडे सर्वांसाठी सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य मागतानाच रत्नागिरी शहराची चाललेली दुर्दशा संपू दे आणि पुन्हा जशी स्वच्छ सुंदर रत्नागिरी होती तशी होऊदे. सर्वत्र असणारे खड्डेमय रस्ते, अपूर्ण पाणी आणि रस्त्यांची बांधकामे, रस्त्यात फिरणारी उनाड मोकाट गुरे दिशाहीन धोरणाने लॉक झालेली विकास प्रक्रियेस योग्य दिशा लवकरच अनलॉक होऊ दे. सर्व अडचणी दूर होऊन, ज्या अडचणी नाकर्त्या सत्ताधीशांच्या अकार्यक्षम कारभारामुळे, दुर्बल इच्छाशक्तीमुळे निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे रत्नागिरीची दुर्दशा झाली आहे त्यांना दिशा दिसू दे.
मागील सहा महिन्यांपासून संयमी रत्नागिरीकर शहरातल्या प्रत्येक रस्त्यातल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत फिरत आहेत. हे गणेशा तुझ्या आगमनाची दखल घेत तरी नगरपरिषदेचे सत्ताधीश जागे होतील ही आशाही फोल ठरली. आता श्रीगणेशा ही दुर्दशा थांबवणे आत्ता तुझ्याच हातात आहे व कायम स्वच्छ सुंदर म्हणून वर्णलेल्या रत्नागिरीला विकासाच्या मार्गावर गति प्राप्त व्हावी आणि अकार्यक्षमतेच्या खड्ड्यांमध्ये निर्माण झालेल्या चिखलातून सुंदर कमळे उमलावीत.
शहरवासीयांना चांगले रस्ते, मुबलक पाणी सुविधा, अद्ययावत आणि स्वच्छ राहील अशी ड्रेनेज सिस्टिम, निश्चित धोरणे ठरवून चालणाऱ्या दर्जेदार मराठी शाळा, स्वच्छ गतीमान प्रशासन अपेक्षित आहे. हे गणेशा, तू दयावान होऊन रत्नागिरी शहराला कार्यक्षम नवे कारभारी देऊन शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे वरदान दे. अशी प्रार्थना केली आहे.