महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये एसटी बसमधून महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्याचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरत असून हाफ तिकीट योजना लागू झाल्यापासून गेल्या १ महिन्यात रत्नागिरी विभागात महिला प्रवाशांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. ‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’ हे ब्रीदवाक्य अनेकदा आपल्या कानावर पडले असेल. ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून एसटीची ओळख आहे. महाराष्ट्रातील गाव खेड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब प्रवाशांना या बसचा मोठा आधार आहे.

महाराष्ट्राचा नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. यात एसटी बसमध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विशेषतः नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला. हाफ तिकीट म्हटले की पैशांची अर्धी बचत होते ही भावनाच महिलांसाठी समाधानकारक ठरली आहे. ज्या महिला एसटी ने प्रवास करत नव्हत्या त्या महिलादेखील आता एसटीने प्रवास करू लागल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील आगारनिहाय माहिती घेतली असता सरासरी ३० टक्के महिला प्रवासी संख्या वाढली असल्याची माहिती एस.टी. कडून देण्यात आली.