रत्नागिरी पालिकेच्या विस्तारीत नळपाणी योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने रत्नागिरीकरांना ६० कोटी रूपये खर्च होऊनही १ दिवस पाणी पिण्याची वेळ आली आहे. याबाबत रत्नागिरी शहरवासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वादातून ६४ कोटींची ही नळपाणी योजना बाहेर पडली. मात्र ठेकेदाराने अपेक्षित गतीने काम केले नाही. २ वर्षात काम पूर्ण करायचे असताना आता ५ वर्षे झाली तरीही काम अपूर्ण आहे. अद्यापही या योजनेत अनेक दोष आहेत. नाचणे ते पानवल या मार्गावर १० कि.मी. अधिक लांबीची ३०० मि.मी व्यासाची पाईपलाईन या योजने अंतर्गत टाकायची होती. अद्याप ठेकेदाराने हे महत्वाचे काम केलेले नाही. यामुळे रत्नागिरीकरांना आता एक दिवस आड पाणीपुरवठ्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.सुमारे ६ ते ७ कोटी रूपयांची पानवल ते नाचणे पाईपलाईन पूर्ण झाली असती तर पानवल धरणातील पाणी ६ महिने रत्नागिरीकरांना उपलब्ध होऊ शकले असते. पाईपलाईन नसल्याने शिळ धरणातून दररोज १८ ते २० एमएलटी पाणी घ्यावे लागत आहे.

पानवल ते नाचणे पाईपलाईन १०.३७५ किलोमीटरची असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. प्रत्यक्षात ती लाईन १२ कि.मी.ची आहे. यासाठी दीड कोटी रूपये वाढीव खर्च येणार आहे. मात्र त्याची तरतूद नाही. त्यामुळे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. महत्वाची बाब म्हणजे पानवलमधील पाणी ग्रॅव्हिटीने येते. त्यामुळे वर्षभराचा विचार करताना १८ ते २० लाख रूपये वीज बिलाची बचत होऊ शकेल. मात्र अजून लाईन झालेली नसल्याने हा अधिकचा खर्च नगर परिषदेला करावा लागणार आहे. त्यातच शिळ धरणातून अधिकचा उपसा होत असल्याने शहरवासियांवर पाणी संकट उभे ठाकले आहे. पाणी उन्हाळाअखेरपर्यंत पुरायला हवे यासाठी रविवार दि. १६ एप्रिलपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.