कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे अद्याप सुद्धा बंदच आहेत. त्यामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारला सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले कि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली जातात, तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोनाचे संक्रमण वाढत नाही, पण मंदिरे उघडल्यावर मात्र होणार्या भक्तांच्या गर्दीमुळे कोरोना वाढतो. नक्की मंदिरे उघडण्यात सरकारला काय अडचण आहे?
जेथून सात्विक विचार बाहेर पडून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना टाळे लावून सरकारला काय मिळत आहे? असा संतप्त सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, असेही अण्णांनी वक्तव्य केले आहे. त्याचप्रमाणे सरकारला इशाराही दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीने राज्यातील सर्व मंदिरं टाळेमुक्त करण्यासाठी आंदोलन उभारावे. त्यामध्ये मी स्वतः सहभाग घेईन. १० दिवसात जर मंदिर टाळेमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे जेल भरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबरच असेन, असा स्पष्ट इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे यांच्या उपस्थितीमध्ये नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेवून राज्यातील बंद करण्यात आलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात हा माझा ठाम विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या सात्विक संस्कारामुळेच आहे. आज वयाच्या ८४ व्या वर्षी माझ्यावर कोणताही डाग नाहीये आणि हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचाच परिणाम आहे. त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे टाळेमुक्त करावीत, असे अण्णांनी म्हटले आहे.