रत्नागिरीतील सौंदर्यामध्ये भर टाकणारे आणि शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होण्यासाठी मदत करणारे रत्नागिरी झाडगांव परिसरातील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. ११ नोव्हेंबर पासून प्रेक्षणीय मत्स्यालय पर्यटक आणि विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आले आहे.
मागील दीड वर्षापासून सुरु असलेला कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे मत्स्यालय त्या ठराविक काळापासून बंद ठेवण्यात आले होते. किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायाचा शास्त्रीय, नियोजित विकास करण्यासाठी सन १९५८ मध्ये पेठकिल्ला येथे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली.
सन १९७२ पासून हे केंद्र केकेव्ही दापोली यांच्या अखत्यारीखाली आहे. संशोधन केंद्र, मत्स्यालयाची इमारत पेठकिल्ला येथे नव्याने बांधण्यात आली आहे. संशोधन केंद्राच्या झाडगांव प्रक्षेत्रावर तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहेत. पर्यटकांना प्रत्येकी २० रुपये माफक दरात तलावात नौकानयन सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जुने असलेले मत्स्यालय अद्ययावत करून ते अतिशय आकर्षक बनविण्यात आले आहे. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ऍक्वारियम स्थापित केली गेली आहेत. त्यामध्ये मरीन ऍक्वारियम गोड्या पाण्यातील माशांचे ऍक्वारियम, सिक्लीड माशांचे ऍक्वारियम, पाण वनस्पतींचे ऍक्वारियम, यांची सुंदर मांडणी, सजावट करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध प्रजातीच्या माशांची पैदास केली जाते. अनेक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन तेथे केले जाते. मत्स्यालय बनविण्याकरिता आधुनिक फिल्ट्रेशन, प्रयाश योजनेचा उपयोग करण्यात आला आहे.
अद्ययावत मत्स्यालयाची मांडणी एवढी सुंदर आणि आकर्षक केलेली आहे, कि कुठेतरी बाहेरील देशातील मत्स्यालयामध्ये वावरत असल्याचा भास होतो. कोविड काळानंतर एवढ्या दीर्घ कालावधीने सुरु झालेले मत्स्यालय नक्कीच रत्नागिरीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.