रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये पूरजन्य परिस्थितीतून जनता सावरत असताना, आता नवीन संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ आणि मोठ्या प्रमाणातील कचरा. कचऱ्याची अजून पुरेशी विल्हेवाट लावण्यात न आल्याने, ते एक प्रकारे रोगराईला आमंत्रणच आहे. शहरात काही प्रमाणात साथीचे आजार बळावायला सुरुवात होत आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
चिपळूणमध्ये पूर ओसरून आता साधारण महिना पूर्ण होत आला असून, तरी शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी अजूनही कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. आणि विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी येत असल्याने त्यांना हा कचरा दाखवण्यासाठी दुकानाच्या बाहेर ठेवावा लागत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात गाळही अनेक ठिकाणी साचला आहे. अनेकांच्या घरातील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून, घरातील भिजलेल्या वस्तू आणि गाळ नागरिकांना रस्त्यावर टाकावा लागत आहे. त्यामुळे हा कचरा आणि गाळ तसाच रस्त्यावर पडून आहे. चिपळुणमध्ये तब्बल ३० हजारांहून अधिक टन कचरा शहर व लगतच्या परिसरामध्ये जमा झालेला आहे.
त्यामुळे शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते उमेश सकपाळ यांनी सदरच्या कचर्याचा विषय बुधवारी चिपळूण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला. सध्या हा कचरा शहरातीलच काही मोकळ्या जागा, मैदानांवर डम्प करण्यात आल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून नागरिकांकडून तक्रारी वाढू लागल्या आहेत. नागरिकांना त्रास होत असल्याने शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पाच्या जागेत हा कचरा डम्प करू नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा चांगलीच दणाणल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.