मुंबईच्या दिशेने येणारी ‘कोकण कन्या एक्सप्रेस’ मार्गात विविध ठिकाणी थांबवण्यात आल्याने आपल्या निर्धारित वेळेपेक्षा बराच उशिरा मुंबईत दाखल झाली. या विलंबाचा थेट परिणाम ‘मांडवी एक्सप्रेस’वर झाला. मुंबई सीएसएमटीवरून आज गुरूवारी सकाळी ७:१० वाजता सुटणारी (१०१०३) मांडवी एक्सप्रेस वेळेवर न सुटल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी ‘मांडवी एक्सप्रेस’ गुरूवारी पुन्हा एकदा विलंबाने धावल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. आज (गुरूवारी) सकाळी सीएसएम टीवरून गाडी वेळेवर सुटणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने येणारी ‘कोकण कन्या एक्सप्रेस’ मार्गात विविध ठिकाणी थांबवण्यात आल्याने आपल्या निर्धारित वेळेपेक्षा बराच उशिरा मुंबईत दाखल झाली.
या विलंबाचा थेट परिणाम ‘मांडवी एक्सप्रेस’वर झाला. रेल्वेच्या नियमांनुसार, कोकण कन्या एक्सप्रेससाठी वापरण्यात येणारा डब्यांचा संच तपासणीनंतर पुन्हा मांडवी एक्सप्रेससाठी वापरला जातो. कोकण कन्या एक्सप्रेसच मुंबईत उशिरा पोहोचल्यामुळे, तिचे डबे मांडवी एक्सप्रेससाठी वेळेत उपलब्ध होऊ शकले नाहीत. परिणामी, मांडवी एक्सप्रेसच्या सुटण्याच्या वेळेवर याचा थेट परिणाम झाला असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला आहे. गाडी वेळेवर न निघाल्याने त्याचा थेट परिणाम पुढील स्थानकांवर झाला. दादर स्थानकावर कोकणात जाण्यासाठी आलेले शेकडो प्रवासी प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे होते. गाडी नक्की कधी येणार, याबाबत सुस्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रवाशांचे हाल – सकाळच्या वेळेत दादर स्थानकावर आधीच प्रचंड गर्दी असते. त्यातच लांब पल्ल्याच्या गाडीला उशीर झाल्याने लहान मुले, महिला. आणि ज्येष्ठ नागरिकांना फलाटावरच तासनतास वाट पाहावी लागली. कोकण रेल्वे आणि गाड्यांचा उशीर हे आता नित्याचेच झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशानी दादर स्थानकावर व्यक्त केली. गाडी उशिरा सुटल्याने ती कोकणात पोहोचायला देखील मोठा विलंब झाला. ज्यामुळे चाकरमान्यांचे आणि गावी जाणाऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

