26.1 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024
HomeChiplunसावर्डेमधील ग्रामस्थांचे उपोषण सुरूच, सांडपाण्याविरोधात आक्रमक पवित्रा

सावर्डेमधील ग्रामस्थांचे उपोषण सुरूच, सांडपाण्याविरोधात आक्रमक पवित्रा

कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे कापशी नदी प्रदूषित होत आहे.

तालुक्यातील सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याविरोधात सावर्डे येथील ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशीही येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले आहे. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, मनसे यांनी भेट देत पाठिंबा दिला. येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगावर कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतरही ग्रामस्थांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. सावर्डे येथील कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे कापशी नदी प्रदूषित होत आहे. याचा फटका सावर्डेसह सात गावांतील ग्रामस्थांना बसत आहे.

या विरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला. याची दखल घेऊन भाजप नेते नीलेश राणे यांनी सावर्डे भुवडवाडी येथे जाऊन प्रदूषित सांडपाण्याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सावर्डे येथील कातभट्टींना बंदचे लेखी आदेश दिले तसेच कातभट्टींचा पाणी- वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्याच्या सूचना ५ जुलै २०२४ला दिल्या होत्या. त्यावर अद्याप कारवाई न झाल्याने प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरवात केली.

गुरूवारी उपोषणकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण आदींनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच प्रशासनासोबत चर्चा करून ग्रामस्थ व शेतकरी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. काँग्रेसने देखील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेस आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. प्रदूषणाबाबत ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून आवाज उठवत आहेत; परंतु त्यावर कारवाई होत नाही. कोल्हापूर येथील विभागीय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कात उद्योगाचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश महावितरणला दिले होते. त्याचेही पालन झालेले नाही.

दरम्यान, उपोषणापूर्वी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कंपनीवरील कारवाईचे लेखी पत्र १३ ऑगस्टला दिले होते. त्यानंतरही ग्रामस्थांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. कारवाई झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. उपोषणात सुरेश भवुड, हरिश्चंद्र नवरंग, राकेश नवरंग, संतोष पुनवत, विठ्ठल निर्मळ, कृष्णा घाणेकर, सुरेश कानसे, चंद्रकांत राडे, प्रवीण भुवड, बाबू गुडेकर, अनंत खांबे, सुरेश खांबे, शशिकांत राणीम, महेंद्र राणीम, नीलेश घडशी, चंद्रकात यादव, सुरेश हुमणे, रवीकिरण निर्मळ आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular