राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्या, या मागणीसाठी एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे ९ ऑगस्टपासून राज्यभर आगार व विभागीय पातळीवर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील यामध्ये सुमारे ६०० एसटी कर्मचारी सहभागी होणार आहेत; मात्र राष्ट्रीय कर्मचारी सेना या आंदोलनात सहभागी होणार नाही. या आंदोलनामुळे एसटी सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात येणाऱ्या या आंदोलनाचे रूपांतर संपात झाले तर ऐन गणपतीच्या मोसमापूर्वीच एसटीची वाहतूक पुन्हा दीर्घकाळ कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. १९९५ नंतर एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.
२०१६ ते २०२० या कालावधीत वेतन करारही करण्यात आला नाही. त्यात तत्कालीन सरकारने ४ हजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ लागू केली; मात्र संपूर्ण ४ हजार ८४९ कोटी रुपये वेतनासाठी वापरण्यात आले नाही. त्यातील ३ हजार कोटी प्रशासनाकडे शिल्लक राहिले आहेत, असे एसटी कर्मचारी संघटनेने सांगितले. जिल्ह्यात या आंदोलनमध्ये एक संघटना सोडली तर सर्व संघटना सामील होणार आहे. राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सुमारे ४०० कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत; मात्र उर्वरित एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनेचे सर्व कर्मचारी सामील होणार आहेत.
वेतन पाच हजारांनी वाढवावे – एसटी कामगारांचे वेतन कमी असल्यामुळे दीर्घकालीन संप पुकारला होता. त्यानंतर राज्य शासनाने नोव्हेंबर २०२१ पासून ज्या एसटी कामगारांची सेवा १ ते १० वर्ष झाली आहे. त्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपये, ११ ते २० वर्षापर्यंत सेवेसाठी ४ हजार रुपये आणि २० वर्षापेक्षा जास्त सेवेसाठी २५०० रुपयांची वाढ लागू केली. या वाढीमुळे सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी तफावत निर्माण झाली असून, ही तफावत दूर करण्यासाठी सरसकट ५ हजार रुपये वाढ द्यावी, अशी मागणीही केली आहे.