रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ऐतिहासिक ठरेल, एक असे पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये ‘आरएआयडीएस’ (रत्नागिरी अॅडव्हान्स्ड इंटिग्रेटेड डाटा सिस्टिम) हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नावीन्यपूर्ण डिजिटल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. अशाप्रकारे ‘एआय’चा गुन्हे तपासासाठी वापर करणारे रत्नागिरी पोलिस दल हे देशातील पहिले पोलिस दल ठरले आहे. यामुळे तपासाला एक नवी दिशा मिळाली आहे,अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, या वेळी त्यांनी अॅप्लिकेशनचे सादरीकरणही केले. अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. बगाटे म्हणाले, नागरिक केंद्रित पोलिसिंग, पारदर्शक ता आणि कार्यक्षमता वाढवण्या साठी रत्नागिरी पोलिसांनी हे डिजिटल हत्यार उपयोगात आणले आहे. या अॅप्लिकेशनमुळे पोलिस आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्ती आणि हिस्ट्रिशिटर, वॉन्टेड आरोपी किंवा एनडीपीएसमधील गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे झाले आहे. अॅपमधील एआय तंत्रज्ञान एकाच फोटोवरून १०८ प्रकारच्या विविध प्रतिमा (ईमेज) तयार करू शकते. जर एखाद्या आरोपीने अटक टाळण्यासाठी दाढी वाढवली, डोक्यावर टक्कल केले किंवा लांब केस ठेवून आपली वेशभूषा बदलली तरीही ‘देवदृष्टी’च्या मदतीने पोलिस त्याला अचूक ओळखू शकणार आहेत. अनेकदा गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपीचे प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसते. अशा वेळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या वर्णनावरून स्केच आर्टिस्टकडून रेखाचित्र तयार केले जाते. ‘देवरूपरेखा’ या फिचरच्या माध्यमातून हे स्केच किंवा एखादा सांगाडा/मृतदेहाचा फोटो अपलोड केल्यास एआय तंत्रज्ञानाद्वारे त्याची स्पष्ट आणि नवीन इमेज तयार केली जाते, ज्यामुळे तपासाचा वेग वाढतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे आणि पारदर्शक पोलिस प्रशासन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ‘आरएआयडीएस’ अॅपमुळे तपास कार्यात अचूकता येईल आणि गुन्हेगारांना पकडणे अधिक सुलभ होईल. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे रत्नागिरी पोलिस दलाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी हे अॅप तपास कामात एक महत्त्वाचे साधन ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
काय कलम लावायचे, हेही सांगणार – देशात लागू झालेल्या नवीन ‘भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३’ च्या अंमलबजावणीसाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त आहे. जर एखाद्या पोलिस अंमल-दाराला विशिष्ट घटनेत कोणते कलम लावावे, याबाबत शंका असेल तर केवळ गुन्ह्याचे वर्णन ‘सर्चबार ‘मध्ये लिहिल्यास हे अॅप तत्काळ संबंधित कलमाबाबत सल्ला देणार. उदा. ‘खून’ सर्च केल्यास कलम १०३ अशी माहिती समोर येते.

