आज १ डिसेंबर, जागतिक एड्स दिन. सर्व प्रथम १ डिसेंबर १९८८ रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस पहिल्यांदा १९८७ सालामध्ये दोन सार्वजनिक माहिती अधिकारी, जेम्स डब्ल्यू.बन आणि थॉमस नेटर यांनी हे प्रस्तावित केले होते. मोहिमेच्या पहिल्या दोन वर्षांत, कुटुंबांवर एड्सचा प्रभाव अधोरेखित करण्यासाठी जागतिक एड्स दिन मुले आणि तरुणांच्या थीमवर केंद्रित करण्यात आला होता.
दरवर्षी या दिवशी अनेक जागृतीपर कार्यक्रम केले जातात. १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो या वेळी विविध कार्यक्रम आयोजित करून एड्स विषयी समाजात जनजागृती केली जाते. कॉलेजमध्ये एनसीसी विभागाअंतर्गत समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची पथनाट्ये केली जातात. याच पार्श्वभूमीवर मंगळवार हा लांजा बाजारपेठेचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने दि. ३० नोव्हेंबर रोजी येथील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने एच.आय.व्ही एड्स या विषयावर “व्हॉट इझ एच आय व्ही एड्स?” या जनजागृती पर लांजा तहसीलदार कार्यालय व बाजारपेठ या ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्याच्या माध्यमातून एड्स होण्याची मूळ कारणे सांगण्यात आली तसेच समाजात असणारे गैरसमज यावर ही भाष्य करण्यात आले. यावेळी एड्स चा विरोध करा, एड्स झालेल्या व्यक्तीचा नको असा महत्वाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
सादरीकरणाच्या वेळी पोलीस ठाणे लांजा चे पोलीस निरीक्षक घुटुकडे, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी वर्ग, कॉलेजचे प्राचार्य विकी पवार, संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश चव्हाण, मार्गदर्शक प्राध्यापक वर्ग व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी कल्पना कॉलेज लांजाच्या वतीने लांजाचे तहसीलदार श्री. प्रमोद कदम, पोलिस ठाणे व नगरपंचायत लांजा यांच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.