30 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ! बनल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या...

आंगणेवाडीत जत्रोत्सवाची लगबग उत्सव ९ फेब्रुवारीला

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणचे 'प्रती...
HomeRatnagiriअजितदादांचे अकाली जाणे मन सुन्न करणारे : ना. सामंत

अजितदादांचे अकाली जाणे मन सुन्न करणारे : ना. सामंत

हा आघात शब्दांत व्यक्त करणे अशक्य असल्याचे सामंत यांनी सांगितले.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठी ही अत्यंत दुःखद आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या समोर मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ही बाब मन सुन्न करणारी आहे.. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ती भरून निघणे शक्य नाही. अजितदादांच्या पावन स्मृतीस मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या अकाली जाण्याने व्यतिथ झालेले ना. उदय सामंत म्हणाले की, माझे आणि अजित पवारांचे संबंध हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते आपुलकीचे, घरगुती स्वरूपाचे होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागावायचेही; मात्र तो रागसुद्धा आपुलकीतूनच असायचा. खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या चर्चा होत, ते हक्काने एखादे काम सांगायचे, मार्गदर्शन करायचे आणि योग्य वेळी स्पष्ट शब्दांत मत मांडायचे हेच त्यांचे रोखठोक नेतृत्व होते.

मंगळवारी संध्याकाळी पुणे एमआयडीसीच्या विकासकामांबाबत आमचे फोनवरून सविस्तर बोलणे झाले होते. परंतु आज बुधवारी सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच मला प्रचंड धक्का बसला. हा आघात शब्दांत व्यक्त करणे अशक्य असल्याचे सामंत यांनी सांगितले. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अजितदादांनी मला खूप सहकार्य केले, पाठिंबा दिला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, अजितदादांनी मला संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची संधी दिली आणि यामुळेच माझा चेहरा राज्यभर ओळखीचा झाला. माझ्या राजकारणातील गेल्या २५ वर्षात त्यांनी मला मार्गदर्शन, पाठिंबा आणि विश्वास दिला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. उद्योग मंत्री झाल्यानंतर प्रशासन कसे चालवावे, निर्णय कसे घ्यावेत, याबाबतही दादांनी अनेक वेळा मला मार्गदर्शन केले. माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली १५-२० वर्षे मी त्यांच्या सोबत काम केले आणि त्यामुळेच आज त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular