बदलापूरमधील एका शाळेतील मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. सोमवारी पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेवून जात असताना आरोपी अक्षयने पोलीसांच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलीसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलीसांनीही स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ‘अक्षय ठार झाल्याचे सांगण्यात येते आहे. या प्रकरणात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला असून सरकार आता या प्रकरणात आणखी कोणाला वाचवत आहे असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. अक्षयच्या आई-वडिलांनी देखील त्यांच्या मुलाचा मृत्यू हा संशयास्पद आहे असे म्हटले आहे.
मुलींवर अत्याचार – सुमारे दिड महिन्यापूर्वी बदलापूरम धील आदर्श विद्यामंदिर या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करणारा अक्षय शिंदे याने २ मुलींवर लैगिंक अत्याचार केले. सुरुवातीला हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न शाळेकडून झाले होते. मात्र काही पालकांनी हे प्रकरण तडीस नेल्यानंतर संशयीत आरोपी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याला अटकही झाली होती. शाळेच्या समोर संतप्त जमावांने आंदोलन केले होते. जनतेने उस्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले होते.
धक्कादायक प्रकार – तेव्हापासून अक्षय शिंदे पोलीसांच्या कोठडीत होता. त्याने आरोप मान्य केल्याचेदेखील सांगण्यात आले होते. नुकतेच आरोपपत्रदेखील पोलीसांनी सादर केले आहे. या साऱ्या पार्श्वभूमि वर सोमवारी अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला आहे.
एन्काऊंटर – सोमबारी २३ सप्टेंबर रोजी, ठाणे क्राइम ब्रँच पोलीसांनी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. दुपारच्या सुमारास पोलीस पथक त्याला घेवून घटनास्थळाची पहाणी करण्यासाठी निघाले होते. हे पथक आरोपीसह मुंबई बायपासजवळ पोहोचताच अंक्षयने एका पोलीसाच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. पोलीसांच्या दिशेने त्याने गोळीबार केला. पोलीसांनीदेखील प्रत्यूत्तरादाखल त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात अक्षय जखमी झाला. सुरुवातीला त्याने स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सायंकाळी त्याचा मृत्यू ओढवताच अक्षय शिंदेचा पोलीसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. पोलीसांनी हा गोळीबार स्वसंरक्षणार्थ केल्याचे सांगितले जात असून या चकमकीत १ पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
आईचा आक्रोश – दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या अक्षयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर खळबळ उडाली असून अक्षय शिंदेच्या आईने माझ्या पोराला हकनाक मारण्यात आल्याचा दावा केला आहे. माझा पोरगा एकदम गरिब आहे. साधा फटाकाही तो वाजवत नाही. तो गोळीबार करणे शक्यच नाही असे म्हटले आहे.
गृहमंत्र्यांनी कोणाला वाचविले? – राजकारणही तापले असून गृहमंत्र्यांनी कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर केला असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. हा बोगस एन्काऊंटर असल्याचा आरोप करताना गृहमंत्र्यांनी कोणाला तरी वाचविण्यासाठी हे आदेश दिले असे त्यांनी म्हटले आहे. संस्थाचालकांना वाचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.