तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. २० वर्षांपूर्वीची भयाण परिस्थिती पुन्हा डोळ्यासमोर तरळू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांनी स्वतःचा देश सोडून जायची तयारी दर्शवली आहे. विमानांमध्ये ज्या प्रमाणे जागा मिळवून, अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तानामध्ये अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपूर्वीच ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु करण्यात आली होती. काबूलमधील भारतीय दूतावासापासून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सुमारे ७० मीटरच्या अंतरावर स्फोट घडवल्याचा मोठा आवाज ऐकू आला होता, त्यानंतर अफगाणिस्तानस्थित भारतीयांच्या सुरक्षेविषयीची चिंता अजूनच वाढली होती.
त्याच दरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार, १५० भारतीयांना काबुल विमानतळावर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त समजले. परंतु, आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळून लावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व भारतीय सुरक्षित असून त्यांच्या पासपोर्टची तपासणी केल्यानंतर तालिबान्यांनी त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अफगाणिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व भारतीय सुरक्षित असून सर्वांची पासपोर्ट पडताळणी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. पुढे दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने १५० पेक्षा अधिक लोकांना आलोकोजई येथे नेले होते, त्यामध्ये भारतीय नागरिकांचा समावेश सर्वाधिक असून, यामध्ये काही अफगाणी आणि अफगाणी सिख नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे हे भारतीय सुखरूपपणे काबुल विमानतळावर रवाना झाले असून, पूर्णतः सुरक्षित आहे.