शहराला लवकरात लवकर पर्यायी पाणीपुरवठा होण्यासाठी शीळ जॅकवेलवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. मुंबई येथील कंपनीचे ३८ कामगार, अन्वी कंपनीचे २० आणि पालिकेचे ८, असे ६६ कामगार अहोरात्र राबत आहेत. १० लाख लिटरच्या नवीन जॅकवेलवर दोन विद्युतपंपांना पाइप जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. शीळ नदीतून या टाकीत पाणी आणण्यासाठी ४ फ्लोटिंग पंप जोडण्यात आले आहेत. उद्या किंवा रविवारपर्यंत शहराला पर्यायी पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. पावसाच्या व्यत्ययावर मात करत कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ जॅकवेल अचानक कोसळल्याने शहरावर मोठे पाणीसंकट ओढवले आहे. अनेक भागांमध्ये चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत नाही. संतप्त नागरिक पाण्यासाठी वारंवार पालिकेवर धडकत आहेत. ठाकरे सेनेने नुकताच पाण्यासाठी मोर्चा काढला. एमआयडीसी, पानवल धरण आणि टँकरद्वारे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शीळ जॅकवेलमधून पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास अजून महिनाभर लागणार आहे; मात्र पालिका प्रशासन आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी नागरिकांना दिलासा मिळावा आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पाणीयोजनेतील नवीन जॅकवेलची टाकी १० लाख लिटरची आहे, त्यावर २५० अश्वशक्तीचे २ पंप बसवण्यात आले आहेत. या टाकीत शीळ नदीतून पाणी आणण्यासाठी नवीन ४ फ्लोटिंग पंप बसवण्यात आले आहेत. त्यासाठी नदीपासून टाकीपर्यंत पाईपलाईन जोडून झाली आहे. फक्त पंप बसवून त्यांना विद्युत पुरवठा सुरू केल्यास येत्या दोन दिवसांत शहराला पाणी मिळणार आहे. अन्वी कंपनीकडून पाईपचे काम पूर्ण होत आले आहे.
पालिकेचे ८ कर्मचारी त्यांना मदत करत आहेत. पावसाने साथ दिल्यास उद्या संध्याकाळी किंवा रविवारी शीळ जॅकवेलवरून थेट साळवी स्टॉपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, पाणी अभियंता अविनाश भोईर आणि पालकमंत्री उदय सामंत या कामाचा पाठपुरावा करत आहेत.