जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. अनेक महावितरणाचे पोल जमीनदोस्त झाले होते. रस्तेच्या रस्ते वाहून गेले. जमीन खचली अशा एक ना अनेक विदारक घटना त्यावेळी घडल्या होत्या.
रत्नागिरी कोल्हापूरमार्गावरील आंबा घाट सुद्धा अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने, एकही ठिकाणी रस्ता खचल्याने महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात पडलेले मातीचे ढिगारे हटवून हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली गेली. मुख्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने एसटी प्रवासी, कोकणातील शेतकरी, लाकूड व्यापारी, चिरेखाण व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला. इंधन, वेळ आणि त्यासोबत पैसा याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता.
नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून सहाचाकी आणि २० टन वजनी गाड्या सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याने वाहतूक सुरू करण्यात आली असून, या संदर्भातील पत्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना, प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिले. त्यामुळे काही महिन्यांच्या कालावधीने आंबा घाट पूर्ववत होत असल्याने एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑक्टोबरला पार पडलेल्या बैठकीमध्ये सहाचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आंबा घाटातील तीन ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते निर्माण करण्यात आलेले. ते काम आता पूर्ण झाले असून, एनएचआयच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून हा मार्ग वाहतुकीला सक्षम असल्याचे पत्र दिले आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग जास्त वजनाच्या वाहनांवर लक्ष ठेवेल, तर महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवणार आहेत. एनएचआयकडून पत्र प्राप्त झाल्यावर तत्काळ वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे आता आंबा घाटातून एसटी बस आणि सहचाकी वाहनांना वाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.