अमृता फडणीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं मत व्यक्त करत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना प्रत्युत्त देण्यात आलं आहे. अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर महिला वकिलांचं मत जाणून घेऊया. अमृता फडणवीस यांचं वक्तव्य हे खूपच हास्यास्पद आहे. घटस्फोटाची कारणं वेगवेगळी असू शकतात. कुटुंबातल्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मात्र ट्रॅफिक मुळे घटस्फोट झाला अशी कोणतीही केस आजतागायत कोर्टासमोर आलेली नाही असा आमचा अनुभव सांगतो.
ट्रॅफिकमूळे कुटुंबाला वेळ देऊ न शकल्याने घटस्फोट होतात हे वाक्य खूपच उथळ आहे. गेल्या बारा ते चौदा वर्षांपासून आम्ही फॅमिली कोर्टामध्ये वकील म्हणून काम पाहतो आहोत, पण एकाही दाम्पत्यानं कोर्टामध्ये अस काही म्हटल्याचं आम्हाला आठवत नाही. अशी प्रतिक्रिया महिला वकील सुजाता सकट, शैला साळुंखे आणि सुनिता शिंदे यांनी दिली आहे.
मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.