रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच शासनाने काही महिन्यांपासून कोरोनातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या अंगारकीला श्रीक्षेत्र गणपतीपुळेत भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गणपतीपुळे येथे आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी देवस्थानाचे सरपंच डॉ. विवेक भिडे, देवस्थानाचे मुख्य पुजारी अभिजित धनवटकर, तहसीलदार शशिकांत जाधव, जयगड पोलिस, आरटीओ, सचिव विनायक राऊत, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महावितरण, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्यासह महसूल विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढील आठवड्यात १३ सप्टेंबरला अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपतीपुळ्यात ४० हजाराहून अधिक भक्तगण दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्सव सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासन हरप्रकारे सज्ज झाले आहे. प्रशासनाकडून दर्शनासाठी भक्तांची व्यवस्था केली असून, विशेष करून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने गणपतीपुळेमध्ये येणार्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, वाहतूक कोंडी न होण्याबाबत पोलिस, आरटीओ आणि ग्रामपंचायतीने व्यवस्था करण्याच्या सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. दर्शनासाठी भाविकांना घेऊन येणार्या बसेसच्या पार्किंगची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता व दिवाबत्तीची सोय ही जबाबदारी मंदिर व्यवस्थापन व ग्रामपंचायतींकडे दिली आहे. आरोग्य विभागाने व महावितरण विभागाने २४ तास पथकं तैनात ठेवावीत, आवश्यक तो औषधसाठा, डॉक्टर, रुग्णवाहिका उपस्थित ठेवण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत.
पोलिस प्रशासनाने देखील अंगारकीला सर्वसाधारणपणे ३५ ते ४० हजार भक्तगण दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. समुद्र खळवलेला असून या परिसरात अनेक ठिकाणी चाळ तयार झालेला आहे. अनेकांना याबाबत अंदाज लावता येत नाही. आणि पोहायला जाणाऱ्यांवर रोख लावण्यासाठी जीवरक्षकांसह पोलिसांचा देखील वॉच ठेवण्यात येणार आहे. तसेच हॉटेल संघटना, ग्रामपंचायत, देवस्थान संस्थान यांनी एकजुटीने कामकाज करावे, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले.