कोरोना काळामुळे आधीच एकतर जनता होरपळून निघाली आहे. आणि त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत सुरु असेलेला संप लक्षात घेऊन सामान्य जनतेची सुरु असलेली परवड थांबावी यासाठी अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप तात्काळ मागे न घेतल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करावी लागेल, असा सूचक इशाराच परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
गेले महिनाभर एसटी कामगारांचा संप सुरू असून महागाई भत्त्यापासून मूळ वेतनातील वाढीसह एसटी कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एसटीच्या संपूर्ण इतिहासात कदापि मिळाली नसेल, एवढी ४१% वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार विलीनीकरणाच्या प्रश्नावर समिती स्थापन करण्यात आली असून १२ आठवडय़ांत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल सरकारवर बंधनकारक असल्याचे परब यांनी सांगितले.
त्यामुळे अशा वेळी लाखो प्रवाशांना वेठीस धरून काही एसटी कामगारांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. आतापर्यंत अंदाजे ९ हजार १४१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली असून आतापर्यंत ९ हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तर रोजंदारीवरील ३६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. एकूण १ हजार ९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाल्याची माहिती महामंडळाने दिली. त्याचप्रमाणे, या संपामधील ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही कारवाईही यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.