मागील काही महिन्यापासून दापोली मुरुड येथील साई रिसोर्टच्या अवैध बांधकामाबद्दल किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्या मध्ये शीत युद्ध सुरु आहे. येथे समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या साई रिसोर्ट बांधकाम प्रकरणी रत्नागिरीचे पालकमंत्री असताना पदाचा गैरवापर करत अनिल परब यांनी हे बांधकाम केले असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी नवीन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील माजी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या दापोलीतील बेकायदेशीर साई रिसॉर्टप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी चार पानी जबाब नोंदवून घेतला असून ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. पोलिस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. दुसऱ्या बाजूला साई रिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी साई रिसॉर्ट तोडले जाईल, त्या दिवशी मी दापोलीत हजर राहीन, अशी भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मांडली.
ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री असताना अॅड. परब यांनी अधिकाराचा वापर करून दापोली येथे बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारले. साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा मागविल्या आहेत. त्यानंतर निविदा उघडून ठेकेदार निश्चित केला जाईल. यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यानंतर साई रिसॉर्ट तोडण्याच्या कामाला सुरुवात होईल. रिसोर्ट तोडण्यासाठी येणारा खर्च पाहून सगळेच आवक झाले आहेत. परंतु, लांबत चाललेला मुहूर्त लवकरच साधण्यात येईल अशी ग्वाही सोमय्या यांनी दिली आहे.