भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतंच मालवण नगरपरिषदेवर जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या समस्येबाबत धडक मोर्चा काढत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना चांगलेच धारेवर धरलं होतं. आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे अशी धमकीवजा दमही निलेश राणे यांनी सर्वांसमोर दिला होता.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निलेश राणेंच्या या वर्तवणुकीवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. हे राणे कुटुंबीय स्वत:ला समजतात तरी काय? अशी थेट विचारणा त्यांनी केली आहे. “नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांची भाषा आणि वागण्याची पद्धत यावर वारंवार चर्चा होत असते. निलेश राणे कोणत्या हक्काने तिथे गेले होते. सध्या ते केवळ सामान्य नागरिक असून, त्यांनी त्याप्रमाणेच वागण अपेक्षित आहे. पदावरील प्रत्येक अधिकाऱ्याला मान सन्मान हा दिलाच गेला पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारु शकतो, पण त्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. आम्ही देखील अनेक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो. पण कुठे बसतो, बोलतो यांच भान ठेवायाल हवं,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
“ही काय भाषा आहे, हे स्वत:ला काय समजतात? सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात लगेच गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तिघांनाही शिस्त लावली पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी देखील या प्रकरणावर टीका करत “ही गुंडगिरी, मवालगिरी काही नवीन नाही. या आधी देखील एका अभियंत्याला चिखलाने माखलं होतं. अनेक वर्ष लोक ही गुंडगिरी का सहन करत आहेत? पण प्रत्येकाचा दिवस येत असतो. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा उगम असतो, त्याप्रमाणेच अंत देखील असतो,” अशी टीका केली आहे.

