रत्नागिरीमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तालुक्यातील निवळी सजाचा तलाठी राजेश इंदल गुसिंगे याला रंगेहात पकडले. मृत व्यक्तीचे सातबारावरील नाव कमी करण्यासाठी नोंद मंजूर करण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठी राजेश गसिंगेला ताब्यात घेतले आहे. महसूल विभागात तलाठ्याला लाच घेताना पकडल्याचे वृत्त कळल्यावर एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची आई काही महिन्यांपुर्वी मयत झाल्याने त्यांचे सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी त्यांनी सजा निवळी यांच्याकडे अर्ज केलेला. तेथील तलाठी राजेश गुसिंगे यांने सातबारावरील नाव कमी करुन तशी नोंद घालण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपयांची मागणी केली. पण त्यानंतर तडजोड म्हणून १ हजार ५०० रु. वर त्यांचे निश्चित झाले.
सदर प्रकारांबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर सोमवारी सायंकाळी निवळी सजा येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. तक्रारदार यांच्याकडून रोख १५०० रु. घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी राजेश गुसिंगेला रंगेहात पकडले. पोलीस निरिक्षक प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली, सहा.पोलीस उपनिरिक्षक संदिप ओगले, हे.कॉ. विशाल नलावडे, पोलीस नाईक दिपक आंबेकर, पो. शिपाई गावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शासकीय कोणतेही काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर, पहिल्यांदी संबंधितांचा खिसा गरम करावा लागतो अशी जगजाहीर ख्याती आहे. परंतु, अशा प्रकरच्या अवैध पैशाच्या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा एवढी कडक करण्यात आलेली आहे कि, एखाद्या कामांमध्ये कोण अडवणूक करत असेल तर, वेळीच पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन पोलीस यंत्रणा कायम करत असते.

