रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये एका संशयिताला लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी काम आणि महिनाभर थांब या उक्तीनुसार काम लवकर होण्यासाठी काही ठिकाणी संबंधितांचा खिसा गरम केल्याशिवाय रखडेलेल्या कामाला हात देखील लावला जात नाही. आणि केवळ अधिकारीच नव्हे तर लिपिक, शिपाई, मध्यस्ती पासून अनेक जणांचा त्यामध्ये वाटा असतो. अनेक ठिकाणी मिळून मिसळून खाऊ अशी वृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे काम पुढे सरकण्यासाठी देण्यात येणाऱ्या चिरीमिरीसाठी शिपाई अग्रेसर असतात.
लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक शासकीय कामांसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी अनेक वेळा अशा लोकांपासून सावध राहण्याचे आणि अशांवर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
चिपळूण येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेतील शिपाई दीपक शांताराम पाष्टे याला ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराने बांधकाम व्यावसायिकाच्या वतीने एका इमारतीच्या गृहनिर्माण संस्था नोंदणीकरीता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिपळूण या कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्या इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र संस्थेची मंजूर उपविधी, सहकारी संस्था नोंदणी अधिसूचना ताब्यात देण्याकरीता कार्यालयाचा शिपाई दीपक पाष्टे याने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड म्हणून ७ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीने सापळा रचून दीपक पाष्टे याला लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण आणि पोलीस निरिक्षक नेत्रा जाधव, सहाय्यक फौजदार ओगले, पोलीस हवालदार कोळेकर, नलावडे, आंबेकर, पवार, गावकर, कांबळे यांनी केली.