आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने ती वाहतूक राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरकडे वळविण्यात आली आहे. अवजड वाहतुकीच्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ओणी पाचल अणूस्कूरा घाटाच्या रस्त्यासह मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने, रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे आत्ता या रस्त्यावरील देखील वाहतूक बंद करण्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी अणुस्कुरा घाट रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून, या रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी खलिफे यांनी केली आहे. याप्रसंगी तहसीलदार शितल जाधव, प्रांत वैशाली माने आणि बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी खलिफे यांनी प्रशासकीय रस्त्याच्या वस्तुस्थितीची माहिती दिली.
आंबा घाट बंद ठेवण्यात आल्याने सध्या फक्त कोल्हापूरला जाण्यासाठी या मार्गावरूनच मोठ्या प्रमाणावर ट्रक, कंटेनर, माल वाहतूक गाड्यांची वाहतूक होते. रस्त्याची पूरती खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस देखील धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वार आणि छोट्या वाहन चालकांना तर रस्त्यावरून वाहतूक करताना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प होण्याची धोकादायक लक्षणे निर्माण झाली आहेत. तरी प्रशासनाने वेळीच या विषयात गांभिर्याने लक्ष घालून या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, केवळ एसटी आणि चारचाकी वाहतूक सुरू ठेवण्यात यावी, असे खलिफे यांनी म्हटले आहे.