21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली.

डॉक्टर्स येऊन तपासतात का… औषधं उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना… असे प्रश्न रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज विचारले. जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. नांदेड जिल्हा रुग्णालयात एका दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर शासनाने पाहणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

देवेंदर सिंह यांनी रुग्णालयातील एनआयसीयू, एनआरएचएम, प्रशासकीय विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे दालन, पीसीपीएनडीटी विधी समुपदेशक दालन, स्त्री रुग्ण विभाग, पुरुष रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, भौतिक उपचार, डीईआयसी, फिजीओथेरेपी विभागांची पाहणी करून माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक आणि सेवेवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांशीही, पुरेशी औषध उपलब्ध आहेत का.. अशी विचारणा करून नसतील तर जी लागणार आहेत त्याबाबत खरेदीचा प्रस्ताव द्या, असे सांगून त्यांनी दाखल रुग्णांचीही माहिती घेतली.

यावेळी उपस्थित परिचारिकांशी संवाद साधून, एकीलाच ड्युटी लावली जाते का… वेळेपेक्षा जादा तर ड्युटी लावली जात नाही ना… अशी विचारपूस केली. काही अडचण असल्यास पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करण्याबाबतही त्यांनी सांगितले. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत विशेषतः स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी त्यांनी विचारणा केली.

RELATED ARTICLES

Most Popular