पावसाळ्यामध्ये सातत्याने उद्भवणाऱ्या शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे; मात्र हा गाळ नदीच्या काठावरच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे हा गाळ पावसाळ्यात पुन्हा नदीपात्रातच जाण्याचा धोका आहे. नदीपात्रातील उपसलेला गाळ स्वखर्चाने नेण्याचे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. पूरस्थितीला कारणीभूत अर्जुना-कोदवली ठरणाऱ्या नदीपात्रातील गाळाचा उपसा करून राजापूरवासीयांना दरवर्षी भेडसावणारी पूरस्थितीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. गाळ उपसा झाल्यानंतर त्याची नदीपात्रातून अन्यत्र वाहतूक होणे अपेक्षित आहे जेणेकरून गाळ उपशानंतर नदीपात्र मोकळे होईल; मात्र उपसलेला गाळ तसाच नद्यांच्या काठावर ठेवण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी वाढताच हा गाळ पुन्हा नदीपात्रामध्ये वाहून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसलेला गाळ काठावर न ठेवता तो अन्यत्र ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, नदीपात्रातील उपसलेला गाळ स्वखचनि नेण्याचे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. शेतीकामासह फळबागायती, जमीन सपाटीकरण वा भरावासाठी ज्या शेतकऱ्यांना गाळाची आवश्यकता आहे त्यांनी ७ माचपर्यंत तहसील कायार्लयात रितसर लेखी अर्ज करून गाळ घेऊन जावा. त्यासाठी महसूल प्रशासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती तहसीलदार गंबरे यांनी दिली आहे.
गाळ उपशासाठी ६४ लाखांचा निधी – या गाळ उपशाच्या कामासाठी शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ६४ लाख रुपयांचा निधी मंजूरही केला आहे. या निधीतून जलसंपदा विभागातर्फे गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले असून, गेल्या काही दिवसांपासून हे काम वेगाने सुरू आहे.