दोन कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घालून ६१ लाख १९ हजारांची फसवणूक केल्याची घटना गतवर्षी घडली होती. बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे रत्नागिरी सायबर पोलिसांनी मूळचा पश्चिम बंगालचा असलेला आणि सध्या गुजरातमध्ये असलेल्या तोतया पोलिसाला गुजरात येथून अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. नेपाल निताई चरण जना (मूळ पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २१ डिसेंबर सकाळी दहा ते २७ डिसेंबर २०२४ दुपारी बारा या कालावधीत नाचणे परिसरात घडली होती. नाचणे येथील वृद्धाने २८ डिसेंबर २०२४ ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांपैकी एकाने फिर्यादीला फोन करून मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करून फिर्यादी यांना तुमचे सीमकार्ड बंद होणार असल्याची भीती घातली.
त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरिता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला. दुसऱ्या संशयिताने फिर्यादीशी २१ ते २७ डिसेंबरला सोशल मीडियावरून हेमराज कोळी नावाचा पोलिस अधिकारी, असल्याची बतावणी करून संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी फिर्यादींना तुमच्या बँक खात्यातून २ कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली. त्यांच्या बँक खात्यातून ६१ लाख १९ हजार ८० रुपये काढून घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. तपासात फसवणुकीच्या आर्थिक व्यवहाराबाबत बँकांकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयित नेपाल निताई चरण जना यानेच फसवणूक केल्याचे उघड झाले. सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, हवालदार संदीप नाईक, अमोल गमरे, विक्रम पाटील आणि कॉन्स्टेबल नीलेश शेला यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पोलिसांकडून आवाहन – मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, नॅशनल सिक्युरिटी विभाग इतरै विभागांतून बोलत आहोत, असे सांगून तुमच्या सीमकार्डचा गैरवापर झाला असून, त्यासाठी तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल तसेच पैसे ट्रान्स्फर करा, असे सांगत असेल तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नको व अशा धमक्यांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.