एकीकडे ऑक्टोबर हिट वाढत असतानाच तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली असून गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छूक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. मी नाही तर माझी पत्नीला कशी संधी मिळेल, यासाठी या इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. आरक्षण सोडत निघताच मतदारसंघ बांधणीच्या हालचालींना आता वेग आला आहे. आरक्षणाची ही सोडत बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लांजा शहरातील पोलिस वसाहत परिसरातील संकल्प सिद्धी बहुउद्देशीय सभागृह येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मारुती बोरकर, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, तहसीलदार प्रियांका ढोले, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, नगरपंचायत कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, अनघा भाटकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५ या शाळेतील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या रिषभ वैभव पवार, मयंक मंगेश मोहिते, सुभद्रा श्रीकांत दास, ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे व शुभ्रा मंगेश पाटोळे या विद्यार्थ्यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.
असे आहे आरक्षण – लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रभाग क्र. १ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र.२ सर्वसाधारण, प्रभाग क्र.३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ४ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्र.५ सर्वसाधारण, प्रभाग क्र.६ सर्वसाधारण, प्रभाग क्र.७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ८ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ९ सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ११ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १२ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १३ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. १४ सर्वसाधारण, प्रभाग क्र.१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र.१६ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. १७ सर्वसाधारण महिला अशी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.
अनेकांचा हिरमोड – दरम्यान, सध्या सर्वत्र ऑक्टोबर हिटमुळे वातावरण तापले असताना राजकीय वातावरण देखील तापण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्यामुळे अनेक इच्छुकांचा चांगलाच हिरमोडही झाला आहे. तर विविध प्रभागांमध्ये नवीन उमेदवार कोण असतील याचे देखील औत्सुक्य सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिले आहे. आता आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने लवकरच निवडणूकीचा कार्यक्रमही जाहीर होणार आहे. या निवडणूकीत कुणाच्या पदरात निराशा व कुणाच्या अंगावर मुलाल पडेल हे येणारा काळच ठरवेल.