मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेले ठिकाण असलेल्या भरणे पुलाखालील दुकाने, हातगाड्या, दुचाकींची अतिक्रमणे गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारनंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. अतिक्रमणे हटविल्यानंतर भरणे नाक्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील भरणे पुल गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड चर्चेत आला होता. या पुलाखाली अनेकांनी दुतर्फा छोटे छोटे गाळे टाकून अतिक्रमणे उभी केली होती. तर अनेकजण या ठिकाणीं वाहने पार्क करून जात असल्याने येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रोहा येथील सहाय्यक अभियंता यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण अधिनियम २००२ चा भंग केल्याप्रकरणी येथील सर्व व्यावसायिकांना ही अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली होती. याबाबत बुधवारी १३ सप्टेंबर रोजी खेड पोलिसांकडून भरणे नाका परिसरात ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक . नितीन भोयर हे. क्रेन, जेसीबी आणि पोलीस फौजफाट्यासह गुरुवारी भरणे येथे दाखल होताच. अतिक्रमण करणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी ट्रॅक्टरमध्ये भरून आपापले साहित्य काढून नेले तर पुलाखाली बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या दुचाकी पोलिसांनी गाडीत भरुन पोलीस स्टेशनला जमा केल्या, पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबाबत नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
गणपतीच्या पार्श्वभूमीवर कारवाई गणेशोत्सव अवघ्या ५ दिवसांवर आला असल्याने महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. भरणे पुलाखालून चिपळूणकडे आणि आंबवली – वडगाव याम र्गाकडे जाताना प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी गणपती उत्सवानंतर पुन्हा याठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात यात आहे.