आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना मुक्त करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला आहे. ‘युनेस्को’च्या २०२४-२५ या वर्षीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी भारत सरकारने ‘भारतातील मराठा साम्राज्यातील किल्ले’ या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित या किल्ल्यांची शिफारस केली होती. भारतीय शिष्टमंडळाने ‘युनेस्को’च्या पॅरिसमध्ये समितीसमोर सादरीकरण करताना या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा पटवून दिला. त्यानंतर समितीने ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून या किल्ल्यांना मान्यता दिली. भारत सरकारने महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ११ किल्ल्यांबरोबरच तमिळनाडूमधील जिंजी अशा मराठा साम्राज्यातील बारा किल्ल्यांची शिफारस ‘युनेस्को’कडे केली होती. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत मौलाची भूमिका बजावलेली आहे.
प्रशासकीय केरे म्हणून काम करण्याबरोबरच शत्रूसैन्यावर वचक ठेवण्याचे कामही या किल्ल्यांनी केले होते. द्रष्टा राज्यकर्ता म्हणून जगभरात गौरविल्या गेलेल्या छत्रपती शिवरायांनी अत्यंत धोरणीपणाने या किल्ल्यांचा वापर करत स्वराज्याची बांधणी आणि रक्षण केले होते. या किल्ल्यांची धास्ती इंग्रजांच्या काळापर्यंत टिकून होती. या किल्ल्यांची रचना, त्याची तटबांधणी, त्यावरील लष्करी व्यवस्था याची मांडणी ‘युनेस्को’समोर करण्यात आली. त्याचे कागदोपत्री असलेले पुरावेही सादर करण्यात आले. याची दखल घेत ‘युनेस्को’ने जागतिक वारसा यादीत या स्थळांचा समावेश करण्यास मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे या किल्ल्यांची ख्याती आणि महत्त्व जगभरात पोहोचणार असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासही मदत होणार आहे. राज्याच्या पर्यटनातही यामुळे मोलाची भर पडणार आहे. ‘स्पर्श तुझ्या पायांचा हो, अन् पेटूनि उठली माती’ असा छत्रपती शिवरायांबद्दल सार्थ अभिमान, आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या कवितेच्या या ओळींप्रमाणेच महाराजांचे गडवैभव आजही लोकांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे, या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश केल्याने किल्ल्यांचे नव्हे, तर या किल्ल्यांमुळे जागतिक वारसा यादीचे महत्त्व वाढल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.