लष्कराच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सोळा खेळाडूंचा सत्कार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते केला जाणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्रशिक्षण घेतले होते. पुणे येथील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात येणार असून, येत्या सोमवारी ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट असे नामकरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्ट रोजी पुण्याला भेट देणार आहेत आणि या दौऱ्यात राजनाथ सिंह पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. राजनाथ सिंह यादरम्यान १६ ऑलिम्पियन खेळाडूंचा सत्कार करणार असून, तेंव्हाच पुण्यातील स्टेडियमला नीरज चोप्राच्या नावाने नामकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. जैनन आणि लष्करप्रमुख जनरल एम.नरवणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
२००६ साली आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये हे स्टेडियम उभारण्यात आले. नीरज चोप्रा भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर आहेत. त्यांनी स्वतः आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतलेले आहे. या स्टेडियममध्ये ४00 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे आणि त्याच्या ऐतिहासिक सुवर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ या संस्थेतील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ आता “नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट” म्हणून ओळखले जाणार असून तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरुण ॲथलेटिक्सलायातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.