गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील मुंढेगाव शिवार येथे हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनांची स्थिती अतिशय भयानक अशी दिसत असून अपघाताची भीषणता स्पष्ट करणारी आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त निघाले – सध्या मुंबईतील अंधेरीमध्ये राहणारे सावंत कुटुंबिय हे नाशिकमधील मुंढेगाव परिसरातील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात गुरूपौर्णिमेच्या उत्सवानिमित्ताने गेले होते. दरवर्षी ते या उत्सवाला येत असत. गुरूवारी सकाळी लवकर ते इको कारने निघाले. गुरूपौर्णिमेनिमित्त दर्शन घेतल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.
कारचा चक्काचूर – दुपारी १ वाजण्याच्या सुमारास इगतपुरी मुंढेगाव येथे त्यांच्या इको कारला राख वाहून नेणाऱ्या बल्गर कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की इको कारचा चक्काचूर झाला. कंटनेर कोसळला. या अपघातात तिन्ही भावंडांसह चालकाचाही जागीच मृत्यू ओढवला.
सावंत कुटुंबियांवर घाला – नित्यानंद सावंत (वय ६२), ‘विद्या सावंत (वय ६५) आणि वीणा सावंत (वय ६८) या ३ भावंडांसह गाडीचा चालक दत्ताराम (पूर्ण नाव माहिती नाही) अशी या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. तिन्ही भावंडे अविवाहित होती. नित्यानंद सावंत हे मुंबई महापालिकेत तर विद्या सावंत बृहन्मुंबई टेलिनिगम (एमटीएनएल) चे निवृत्त कर्मचारी आहेत. अपघातप्रकरणी ठोकर देणाऱ्या कंटेनरचा चालक सुरेंद्रकुमार वर्मा याला नाशिकच्या घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर वाहतूक तासभर ठप्प झाली होती. आसपासची मंडळी आणि महामार्गावरून त्यावेळी प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनी म दतकार्यात भाग घेतला.
तोंडली गावावर शोककळा – तोंडली गावामध्ये या अपघाताची खबर गुरूवारी सायंकाळी उशीरा मिळाली. गावातील तिघांचा मृत्यू ओढवल्याचे कळताच अख्ख्या गावावर शोककळा पसरली. नातेवाईक मंडळींनी मुंबईला धाव घेतली. गुरूवारी रात्री उशीरा चौघांचेही मृतदेह त्यांच्या मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी आणण्यात आले. तर सकाळी ११ वा. अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते.
एकाच कुटुंबातील तिघे – मूळचे चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील रामवाडीमध्ये राहणारे सावंत कुटुंबिय हे व्यवसाय, उद्योगानिमित्त मुंबईतील अंधेरी ‘येथे राहत होते. त्यातील तिघांचा या अपघातात मृत्यू ओढवला. त्यांच्या पश्चात दोन बहिणी आहेत. उच्च विद्याविभूषित असे हे कुटुंब आहे. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याचे कळताच हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू पावलेले सावंत कुटुंबिय हे सावर्डे येथील जेष्ठ पत्रकार आणि व्यावसायिक सुशील सावंत यांचे बंधू आणि भगिनी होत.