सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीबांच्या जमिनी हडप करण्यासाठी परप्रांतीय पुरुष व महिलांना आणून प्रसंगी जिल्ह्यातील स्थानिक बाई माणसांना मारझोड करण्याचा प्रकार घडल्याची चर्चा साऱ्या जिल्ह्यात गावोगाव सुरु झाली आहे. कुणा बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त लाभलेल्या मंडळींनी हे प्रकार केल्याचे चर्चिले जाते. परप्रांतातून पुरुष व महिला आणल्या जातात.. सुमारे ३० ते ४० परप्रांतीय अशाच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या दाभोली परिसरात आणण्यात आले आणि तेथे जे काही घडले त्याचे व्हिडीओ आता प्रसृत झाले आहेत. एका बड्या राजकीय नेत्याचे पाठबळ लाभल्याने ही मंडळी विलक्षण बेफाम झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. असे जर असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब ग्रामस्थांना, बायाबापड्यांना जिणे हराम होईल आणि आपली घरेदारे जमीनजुमला या राजकीय पुढाऱ्यांच्या दलालांना कवडीमोलाने विकून टाकावी लागतील अशी भीती आता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावच्या परिसरातं घडल्याचे सांगण्यात येत असून स्थानिक बाईमाणसांना परप्रांतीय बायका मारझोड करीत असल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
आडदांड महिला – या व्हायरल झालेल्या व्हिडीओत स्थानिक भगिनींना मारझोड करताना परप्रांतीय आडदांड महिला दिसतात. या परप्रांतीय आडदांड महिला या स्थानिक भगिनींना घेरुन हाताने फटकावताना दिसतात, मान आवळताना दिसतात तसेच स्थानिक भगिनींना चहूबाजूंनी घेरुन झिंज्या ओढताना आणि हल्लाबोल करताना दिसून येतात. हा व्हिडीओ सिंधुदुर्ग पासून मुंबई पर्यंत जाऊन पोहोचला आणि मग मोठी खळबळ उडाली, सर्वत्र या घटनेची चर्चा सुरु झाली.
महिलांचे जीवन कष्टाचे – सिंधुदुर्गातील ग्रामीण विभागात राहणाऱ्या महिलांचे जीवन अतिशय कष्टप्रद आहे. नवरा, सासू-सासरे, दीर, नणंदा, मुले यांचे सर्व सांभाळून त्यांना शेती-भाती, घर-दार, परडे, परसू, गुरेढोरे यांचेही पहावे लागते. बिचाऱ्या दिवसभर राबत असतात. गावातील तुटपूंजी शेती, भात, नाचणी, कुळीथ कसेबसे कष्ट करुन पिकवतात आणि आयुष्य ओढत असतात. वर्षाचे बाराही महिने त्यांना रणरणत्या उन्हात व मुसळधार पावसात धडपड करावी लागते. निसर्गाने साथ दिली तर शेती पिकते अन्यथा दुसऱ्याच्या कामावर पैरे म्हणून जावे लागते.. त्यांचे जीवन हे असे कष्टप्रद असते.
धनदांडग्यांची नजर – अशा स्थितीत खेड्यापाड्यातील या गोरगरीबांच्या घरादारावर व शेतीभातीवर आता धनदांडग्यांची नजर पडू लागली आहे. धनदांडग्यांना चवली पावलीच्या दरात त्यांच्या जमिनी हव्या असतात. त्यासाठी ते राजकीय पाठबळ लाभलेले दलाल हाताशी धरतात. अशा दलालांना बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभलेला असतो त्यामुळे ते वाट्टेल त्या थराला जातात.. कसेही करुन गोरगरीबांच्या जमिनी ओरबाडून घ्यायच्या असा त्यांचा प्रयत्न असतो.
खतरनाक फायटींग – वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली परिसरातील अशीच काहीशी घटना घडल्याचे सांगण्यात येते. तेथे सुमारे ३० ते ४० परप्रांतीय महिला व पुरुष आणण्यात आले. त्या परप्रांतीय आडदांड महिलांनी गरीब स्थानिक महिलांवर जुलूम केला, मानगुट पकडली, थपडा लगावल्या, झिंज्या उपटल्या आणि त्यांना घेरुन दमबाजी केली. यामुळे परिसरीत साऱ्या महिला व गोरगरीब ग्रामस्थ हबकले. भविष्यात आपणाला आणखी काय भोगावे लागेल हेच त्यांना समजेनासे झाले.
तळपायाची आग मस्तकात – स्थानिक बाई माणसांवर परप्रांतीय आडदांड महिला धाऊन आल्याचा व्हिडीओ कुणीतरी ‘शूट’ केला आणि तो व्हिडीओ हा हा म्हणता मुंबई पर्यंत जाऊन थडकला. व्हिडीओ पाहताच चाकरमान्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. आपण मते विकत घेतली म्हणून राजकीय पुढारी गोरगरीबांच्या मदतीला जात नाहीत का? यामध्ये जमीन व्यवहारात असलेल्या सिंधुदुर्गातील एका डॉक्टरांचा व कायदेतज्ञांचा सहभाग असंल्याचीही चर्चा आहे.
संकटांची पायाभरणी ! – स्थानिक महिलांना मारझोड होत असल्याचे व्हिडीओ सर्वदूर जाऊन पोहोचले. अक्षरशः झिंज्या उपटल्या जात असल्याचा खतरनाक फायटींग व्हिडीओ मुंबई पर्यंत जाऊन थडकला तरी पुढारी मंडळींना अद्याप जाग आलेली नाही. याबाबत बोलताना मुंबईतील काही चाकारमान्यांनी भावना व्यक्त केली की, “व्हिडीओतील दृश्य पाहिल्यानंतर आज केवळ आमच्या एका दाभोली गावच्या बाई माणसांवर संकट आले असे नव्हे तर कोकणावर पुढील काळात येणाऱ्या संकटांची ही पायाभरणी होय!” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.