गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मटण व मच्छीमार्केट इमारतीच्या लोकार्पणाची तयारी नगरपालिकेकडून सुरू आहे. हा प्रकल्प २० वर्षे रखडल्याने व्यापारी या सुविधेपासून वंचित होते. आता याची रंगरंगोटी सुरू झाली असून पुढील ३० वर्षांच्या मुदतीसाठी लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. या इमारतीला रंगरंगोटी करून नवा साज चढवण्यात आला आहे. या कामावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी आक्षेप घेत स्ट्रक्चर ऑडिट प्रमाणे दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याची दखल न घेताच तात्पुरती दुरुस्तीची कामे केली जात आहेत. शिवाय लवकरच या इमारतीमधील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया देखील प्रशासनाकडून सुरू आहे. साधारणतः २००६ मध्ये मटण व मच्छीमार्केटच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर काही वर्षातच हे काम पूर्ण करण्यात आले. मात्र अंतिम टप्प्यातील काही कामे बारगळी.
त्यामुळे या इमारतीला अखेरपर्यत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला बैठक नाही. परिणामी २० वर्षे हा प्रकल्प रखडला. काही महिन्यांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत संबंधित व्यापाऱ्यांची घेतली होती. बैठकीत व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा नगरपालिकेकडून दिल्या जातील, मात्र व्यापाऱ्यांनी आधी लिलावात सहभागी होण्याचा सूचना मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केल्या होत्या. त्यानुसार व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. याविषयी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी लिलाव प्रक्रियेसाठी ३० वर्षांची मुदत ठेवल्याने आक्षेप घेतला. याशिवाय स्ट्रक्चर ऑडिटप्रमाणे काम करणे आवश्यक असल्याची मागणी केली होती. मात्र पालिकेकडून या इमारतीच्या दुरुस्तीचे काम घाईघाईने पूर्ण करत रंगरंगोटी देखील करण्यात आली. आता लवकरच या इमारतीतील गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी देखील सुरू केली आहे.