क्रिकेट जगात सुन्न करणारि घटना घडली असून, ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात आकस्मित मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला रात्री १०.३० च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर देखील सायमंड्स निधन झालं आहे.
डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र ते असफल ठरले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं असल्याने, अजून एक धक्का पचविणे कठीण जात आहे. .
अपघाताची माहिती मिळताच क्वीन्सलँड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात भरधाव वेगात असलेली कार उलटल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीमध्ये होता. एलिस नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात सायमंडला गंभीर दुखापत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सायमंड्सच्या कुटुंबीय आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट विश्वात तसेच इतर स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेन वॉर्नच्या काही आठवड्यांनंतरच क्रीडा जगताला दुसरा मोठा झटका बसला आहे. सायमंड्सची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट देखील शेन वॉर्नला श्रद्धांजली देणारी होती. या दोघांच्या जाण्याने त्यांची निर्माण झालेली पोकळी न भरणारी आहे अशी अनेकांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहिली आहे.