रत्नागिरी शहरी मध्यवर्ती भागामध्ये सुरु असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामकाज, विजेची भू अंतर्गत पाईप लाईन आणि रत्नागिरी मध्ये नव्याने सुरु करण्यात आलेली नळपणी योजना यामुळे रत्नागिरी साधारण १ ते दीड वर्ष पूर्ण खोदूनच ठेवण्यात आली होती. वाहन आणि वाहनचालकांनी त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन केला आहे. अनेक ठिकाणी अपघात देखील घडून आले आहेत.
कित्येक ठिकाणी तर ठेकेदाराने पूर्ण झालेला रस्ता पुन्हा काहीतरी करायचे राहिल्याने खोदकाम करून उखडून काढलेला, त्यामुळे जनता प्रचंड संतप्त झाली होती. मारुती मंदिर ते मजगाव रोड जवळ गोडबोले स्टॉप जवळ पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे. ही पाईपलाईन नवीन असताना देखील ती लिकेज झालीच कशी? यावरून पाण्याची पाईप लाईन किती निकृष्ट दर्जाची आहे हे दिसून येत आहे. त्याप्रमाणेच रस्त्यांमधील खड्डे बुजवून त्यांची डागडुजी करून मग डांबरीकरण करण्यात आले तरी देखील या पाइप लाइनच्या गळती मुळे रस्त्यावरती पाणीच पाणी दिसत आहे,मग या नवीन रस्त्यांच्या कामाबद्दल देखील प्रश्नचिन्हच उभे राहत आहे.
शहरात काही भागात डांबरीकरण झाल्यानंतर असे प्रकार समोर येत आहेत. हे असे किती दिवस चालू राहणार असे नागरिक प्रश्न विचारत आहे. तसेच नवीन पाईप लाईन असून देखील प्रत्येक वेळी नव्या ठिकाणी फुटत असल्याने या पाईपलाईनचे काम योग्य रीतीने झाले की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे कि नवीन पाईप लाईनदुरुस्त करण्यासाठी पुन्हा रस्त्यांची खोदकामे सुरु करणार का !असा सवाल जनतेमधून केला जात आहे.